शिरुर: बेट भागासह शिरूर तालुक्यात डिंभा व चासकमान धरणांचे पाणी नदी व कालव्यांद्वारे शेतीसाठी मोठया प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी बारमाही पिके घेत आहे. जंगलांची मोठया प्रमाणावर कत्तल केल्यामुळे व तेथे पाणी व पुरेसे खादय उपलब्ध होत नसल्याने जंगल सोडून बिबट्यांनी ऊसशेती व इतर पिकांमध्ये राहणे पसंद केले असुन परीणामी बिबट शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांबरोबरच आता नागरीकांना आता भक्ष म्हणुण लक्ष करू लागला आहे. जांबुत येथे बिबटयाच्या हल्ल्यात दोन वर्षापुर्वी एका बालकाचा व दोन महीन्यांपुर्वी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पिंपरखेड , वडनेर येथील बिबटयाने नागरीवंर हल्ले चढवून गंभीर जखमी केले आहे.

शिरूर तालुक्यात बिबटयांची संख्या मोठया प्रमाणावर वाढल्यामुळे दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना बिबटयाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी व नागरीक भयभीत झाले असून रात्रीच्या वेळेस शेतीला पाणी देण्यासाठी विज उपलब्ध करणाऱ्या महावितरणच्या आढमुठया धोरणामुळे शेतकरी आणखीनच हतबल झाला आहे. रात्रपाळीऐवजी दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असुन दिवसा वीज ऊपलब्ध न झाल्यास येत्या महीनाभरात महावितरणच्या आढमुठया धोरणाविरोधात शेतकरी संघटना मोर्चा काढणार असल्याचे माऊली ढोमे यांनी सांगितले आहे.रात्रीच्या वेळेस बिबटयाच्या भितीने नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे शेतकऱ्यांच्या विदयुत मोटारी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच दररोज कोणत्या ना कोणत्या गावात शेतकऱ्यांचे पशुधन बिबटया फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.