रत्नागिरी : शहराच्या पाणी पुरवठ्यातील सर्वच्या सर्व १४ झोन येत्या दोन-तीन दिवसांत कार्यान्वित होणार आहेत. संपूर्ण शहराला आता शीळ धरणातूनच पाणीपुरवठा होणार आहे. सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रतिदिन तीन दशलक्ष लिटर पाणी घेतले जाते. ते आता बंद होणार आहे. यामुळे रत्नागिरी पालिकेची लाखो रुपयांची बचत होणार आहे.

 रत्नागिरी शहराच्या नवीन नळपाणी योजनेतील १४ झोनपैकी एका झोनमधील अंतर्गत जलवाहिनी टाकणे, या जलवाहिनीवरून नळजोडण्या देणे, टेस्टिंग करणे ही कामे लांबली होती. आता जलवाहिनी घालून त्यावरून जोडण्या देण्याचे काम पूर्ण झाले आहे. यापुढे पाणी पुरवठ्याचे टेस्टिंग होणे बाकी आहे. हे टेस्टिंग झाल्यानंतर संपूर्ण शहराला शीळ धरणातील पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. रत्नागिरी शहरातील काही भागांमध्ये औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जात होता. प्रतिदिन ३ दशलक्ष लिटर पाणी महामंडळाकडून घेतले जात होते. याचे दरमहा ८ लाख रुपये बिल भरावे लागत होते. त्याची आता बचत होणार आहे. रत्नागिरी शहराला शीळ, पानवल धरणातून पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर काही भागांमध्ये औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी पुरवले जात होते.