रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगत असलेल्या मिरजोळे घवाळीवाडी येथील जंगलमय भागात आज सकाळी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसाना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मोहम्मद हनीफ फकीर पावसकर (55, मिरजोळे, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास मिरजोळे येथे एकाचा मृतदेह असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पावसकर यांच्या पत्नीने 23 सप्टेंबर रोजी पती बेपत्ता असल्याची खबर शहर पोलीस स्थानकात दिली होती. आज मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी याची शहानिशा करताना मृतदेहाची पाहणी करून अंगावरील कपड्यांची माहिती पावसकर यांच्या पत्नीला दिली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते. मात्र अंगावरील कपड्यांवरून पत्नीला ओळख पटली. यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.