रत्नागिरी : काही वर्षे रखडलेले रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठेकेदाराने मागितलेली वाढीव ७ कोटीची रक्कम शासनाने मंजूर केली आहे. त्यामुळे बसस्थानकाचे प्राथमिक काम सुरू झाले असून येत्या आठ दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरी दौऱ्यावर असताना मंत्री सामंत यांनी आज सकाळी हायटेक बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाला भेट दिली.

यावेळी एसटीचे अधिकारी उपस्थित होते. काम रखडण्याचे नेमके कारण त्यांनी जाणून घेतले. बांधकाम रखडण्याला वाढीव निधी कारणीभूत होता. कोरोनानंतर बाजारातील साहित्याच्या किंमती वाढल्यामुळे काम ठप्प झाले होते. यासाठी सुमारे सात ते आठ कोटी रुपये वाढीव रक्कम लागणार होते. त्यामुळे सुमारे १० कोटीचे काम सतरा ते अठरा कोटींवर गेले आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पहिल्या दौऱ्यात याठिकाणी भेट दिली होती.

आज सामंत यांनी भेट देऊन पाहणी केली. मागील अडीच वर्ष या बांधकामासाठी वाढीव निधीची तरतूद व्हावी यासाठी सामंत प्रयत्न करीत होते. परंतु निधी उपलब्ध होत नव्हता. तत्कालीन पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे परिवहन खाते असतानाही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत सामंत म्हणाले, रत्नागिरी हायटेक बसस्थानकाला लागणारा वाढीव निधीला शासनाने मंजुरी दिली आहे.