खेड : तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला असल्याने या ७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या ग्रामपंचायतीमध्ये राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरवात केली असून राजकीय डावपेचांना सुरवात झाली आहे. यावेळी सरपंच या महत्त्वाच्या पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

खेड तालुक्यात ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे. त्या ग्रामपंचायतीमध्ये देवघर, अस्तान, असगणी, तळघर, सुसेरी, नांदगाव, वडगाव बुद्रुक या ७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

खेड तालुक्यात एकूण ७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्या तरी लोटे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारित टप्प्यात येणाऱ्या असगणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या आधी असगणी ग्रामपंचायत निवडणुकीला तितकेसे महत्त्व प्राप्त झालेले नव्हते. अन्य ग्रामपंचायतीप्रमणेच ही निवडणूक होत होती आणि जात होती मात्र आता असगणी हे गाव औद्योगिक वसाहतीच्या विस्तारित टप्प्यात समाविष्ट असल्याने या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक मोठं मोठे प्रोजेक्ट होऊ घातले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार गावाची जनगणनेनुसार १,८९१ लोकसंख्या आहे. तर मतदार संख्या १,५६० आहे. तीन प्रभागांमधून प्रत्येकी ३ असे एकूण ९ सदस्य निवडून जाणार आहेत. तर १० वा सरपंच असणार आहे. सरपंचपदासाठी मागासवर्गीय स्त्री राखीव आरक्षण असल्याने या जागेसाठी अनेकजण उत्सुक आहेत.

या गावात बहुतांश मतदार हे मागासवर्गातीलच आहेत तर मुस्लीम समाजही येथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे असगणी ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार असे संकेत मिळत आहेत. असगणीप्रमाणे देवघर, अस्तानं, तळघर, सुसेरी, नांदगाव, वडगाव या ग्रामपंचायतीमध्ये राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरवात केली आहे. निवडणूक होत असलेल्या सगळ्याच ग्रामपंचायतींवर आपलाच सरपंच विराजमान व्हावा यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत मात्र सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात द्यायच्या हे ठरविण्याचा अधिकार हा केवळ मतदारांनाच असल्याने या सातही ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकेल हे जनता ठरवणार आहे.