चिपळूण: वालोपे रेल्वेस्थानक परिसरातील टपरीवर गांजाची विक्री करणाऱ्या एकाला ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली. यामुळे अशा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गणेश पर्शुराम साळवी (५२, मूळगाव माणगाव- रायगड, सध्या वालोपे बौद्धवाडी) असे कारवाई झालेल्याचे नाव आहे.

गणेश वालोपे रेल्वेस्थानक परिसरातील टपरीवर गांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११.४५ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने येथे छापा मारला. यावेळी टपरीत १० हजार ७५० रूपये किंमतीचा ४३९ ग्रॅम ओला गांजा आढळून आला. तो जप्त करीत त्याला अटक करण्यात आली. याची फिर्याद सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळुंखे यांनी दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील करीत आहेत.

'काही दिवसांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शहरातील दोन ठिकाणी छापे मारून लाखो रूपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यापाठोपाठ पोलिसांनी टपरीवर छापा मारून गांजा जप्त केला. या सलगच्या कारवाईमुळे असा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अनेक बडे व्यावसायिक सध्या गायब झाल्याची चर्चा सुरू आहे. जनतेकडून या दोन्ही कारवायांचे स्वागत होत आहे..