परळी (दि. 08) - परळी येथील पद्मावती गल्लीतील 45 वर्षीय सोमनाथ भोईटे या मतिमंद रुग्णाचे अतिशय आव्हानात्मक असे डोळ्यांतील मोतिबिंदूचे (cataract) ऑपरेशन परळीतील प्रसिद्ध डॉक्टर श्रीगोपाल झंवर यांनी यशस्वी करून दाखवले आहे.

मतिमंद असलेला रुग्ण, त्याला परिस्थितीची समज नसताना तो एका जागी झोपून राहू शकत नाही. अशा अवस्थेत त्याला भूल देणे कठीण होते. उलट आपल्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे पाहून तो सतत बेड वरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. 

या रुग्णाच्या नातेवाईकांनी सदर रुग्णास जालना, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी देखील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नेले होते, मात्र तेथील डॉक्टर सदर रुग्णाचे ऑपरेशन करू शकले नाही. 

परंतु डॉ. झंवर यांनी या रुग्णाच्या ऑपरेशनची जोखीम पत्करण्याची तयारी दाखवली व विना भुलीचे ऑपरेशन यशस्वी करून दाखवले. दुर्बीनीखाली ऑपरेशन करताना रुग्णाने स्थिर राहणे आवश्यक असते मात्र रुग्णाच्या हालचाली सुरूच होत्या. या ऑपरेशन दरम्यान डॉ. लक्ष्मीकांत लोहिया तसेच डॉ. वंगे दादा यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले.