जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी वर्गाचे वेतन लटकले; सप्टेंबर समाप्त झाला तरी वेतन नाही

रत्नागिरी : ऐन सणासुदीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नसल्याचे कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत प्रत्येक श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे वेतन होते मात्र ऑक्टोबर महिन्याची ८ तारीख उलटूनसुद्धा अद्याप (NPS) राष्ट्रीय पेंशन योजने अंतर्गत येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी वर्गाचे वेतन झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे गृहकर्ज, विमा हप्तेवर संबंधित बँक व कंपन्यांकडून दंड आकारला जात असून मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कार्यालयातील बहुतेक कर्मचाऱ्यांनी गृहकर्ज घेतले असल्याने त्यांना वेतन दिरंगाईमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

दरम्यान जुन्या पेंशन योजनेमध्ये समावेश असलेल्या अधिकारी कर्मचारी वर्गाचे वेतन झाले असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे जुन्या पेंशन योजनेअंतर्गत अधिकारी कर्मचारी तुपाशी तर राष्ट्रीय पेंशन योजनेअंतर्गत येणारे कर्मचारी, अधिकारी उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

यावेळी ऐन दसरा सणाच्या निमित्तावर नव्या/राष्ट्रीय पेंशन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने यंदाचा दसरा सणदेखील पगाराविना साजरा करण्याची नामुष्की ओढवली. जुन्या पेंशन योजनेअंतर्गत कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वेतन सालाबातप्रमाने झाले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी परिसरात "OPS ओक्के, NPS नॉट ओक्के" अशा स्वरूपाचे विनोद करून कर्मचारी एकमेकांची खिल्ली उडवत आहेत.