चिपळूण : तालुक्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला नसला तरी तो होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांचे गोधन वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या आदेशानुसार जनावरांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.. त्यानुसार चिपळूण तालुक्यात आतापर्यंत सुमारे ६ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्याला दहा हजार लस पाठविण्यात आल्या होत्या. यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या रामपूर, सावर्डे, कापरे, कळकवणे, कुंभार्ली, वहाळ, तुरंबव, नांदगाव या आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ४ हजार ६०० लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी ३ हजार ५१२ जनावरांना लस देण्यात आली. त्यातील ११२ लस वाया गेल्या असून सध्या ९७६ लस शिल्लक आहेत. राज्यशासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ५ हजार ४०० लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी २ हजार ४१५ जनावरांना लस देण्यात आली तर ७९ लस वाया गेल्याने सध्या २ हजार ९०६ लस शिल्लक आहेत. पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे लसीकरण कामात मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र त्यावर वेळीच मार्ग काढून कंत्राटी पध्दतीवर १७ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या डोक्यावरचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

चिपळूण तालुक्यात ३५ हजार जनावरांची नोंद

चिपळूण तालुक्यात ३५ हजार गाय, बैल, म्हैस व रेडा या पाळीव जनावरांची अधिकृत नोंद आहे. राज्यशासनाकडून या जनावरांना टप्प्याटप्प्याने लस पुरविली जाणार आहे. उपलब्ध लसीनुसार या जनावरांचे लसीकरण केले जाणार आहे.

- श्री. व्ही. एस. बारापात्रे पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, चिपळूण