औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच निवडीत भाजपने सदस्यांची फोडाफाडी करीत बाजी मारत शिंदे गटाला धक्का दिला. सरपंचपदी दिलीप बाबुराव शेजुळ, तर उपसरपंचपदी भावना विनोद शेजुळ विराजमान झाले. ९ पैकी सरपंच, उपसरपंच यांना प्रत्येकी ६- ६ तर विरोधी उमेदवारांना ३- ३ मते मिळाली.   सरपंच, उपसरपंच निवडीसाठी शुक्रवारी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यात भाजपकडून सरपंचपदासाठी दिलीप शेजुळ, उपसरपंचपदासाठी भावना शेजुळ याांनी तर विरोधी शिंदे गटाकडून सरपंचपदासाठी माधुरी समाधान गायकवाड यांनी तर उपसरपंच पदासाठी वंदना कल्याण शेजुळ यांनी अर्ज दाखल केले होते. यात भाजपचे उमेदवार ६- ३ अशा फरकाने विजयी झाले. बैठकीला सदस्य प्रदीप शेजुळ, मनीषा सुनील पांढरे, पार्वताबाई किसन दुधे, भगवान नाईक, भगवान आहिरे उपस्थित होते. या निवडीत स्वतःला मंत्री अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख सांगणारा एक सदस्य गळाला लागला व फोडाफोडीत भाजपला यश आले, तर पारडे जड असल्याचे लक्षात येताच पुन्हा एका महिला सदस्याने आपले मत भाजपच्या पारड्यात टाकले.अध्याशी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी भाग्यवंत यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी वाल्मीक म्हस्के, ग्रामसेवक दयानंद गुंजकर यांनी मदत केली. निवड होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी साहेबराव शेजुळ, किरण शेजुळ, रामदास दुधे, राधाकिसन ढवळे, साहेबराव आहिरे, सोमिनाथ पाटील आदी उपस्थित होते.