औरंगाबाद : नाशिकमध्ये झालेल्या अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतची चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. दरम्यान पालकमंत्र्यांनी अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयास भेट दिली. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. दरम्यान आग लागण्यामागे कारण काय? ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती का? याबाबत माहिती घेऊन मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या. या संपूर्ण घटनेने यवतमाळ जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.आज शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद रोडवर खाजगी बसला आग लागली. यात 11 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही घटना घडली. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बस काही क्षणात जळून खाक झाली. दरम्यान, अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले होते का? नेमका हा अपघात कशामुळे झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.