रत्नागिरी : सोशल मीडियावर सध्या मुलं पळविणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याच्या निव्वळ अफवा आणि संभ्रम आहे. जिल्ह्यात अशी एकही घटना घडल्याची नोंद आमच्याकडे नाही. नागरिकांनी आणि विशेषतः मुलांनी कोणत्याही घटनेची खात्री केल्याशिवाय

सोशल मीडियावरील मेसेज (संदेश) फॉरवर्ड करू नका, कायदा हातात घेऊ नका. तसे काही वाटले तर तत्काळ ११२ या टोलफ्री क्रमांकावर कॉल कराल लगेच मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले.

रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा पोलिस दलातर्फे शिर्के प्रशालेमध्ये आयोजित विद्यार्थी सुरक्षा जनजागृती उपक्रमात ते बोलत होते. यावेळी सहायक आरटीओ अजित ताम्हणकर, उपअधिक्षक श्री. शेळके, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, पालिका शिक्षण विभागाचे प्रभारी प्रशासक सुनिल पाटील, शिर्के प्रशालेचे मुख्याद्याक श्री. चव्हाण सर आदी उपस्थित होते.

श्री. गर्ग यांनी थेट मुलांसमोर येऊन त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, कसे आहात तुम्ही सर्व, माझ्याबरोबर तीन घोषणा द्या, भारत माता की... जय, भारत माता की... जय, भारत माता की...जय. सध्या सोशल मीडियावर संभ्रम पसरविला जात आहे. मुलं पळवुन नेणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. मात्र अशी घटना घडल्याची एकही तक्रार जिल्ह्यात कोणत्याच पोलिस ठाण्यात दाखल नाही. त्यामुळे यावर विश्वास ठेऊ नका. याबाबत जागृती झाली पाहिजे. कोणतीही घटना घडली असेल तर त्याची आधी खात्री करा. खात्री झाल्याशिवाय कोणताही संदेश (मेसेज) पुढे पाठवु नका. अनेक विद्यार्थी एसटीने प्रवास करतात. या प्रवासात अनोळखी व्यक्तीशी संबंध येतो. अशावेळी कोणत्याही अनोळखी

व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. त्याने दिलेला खाऊ घेऊ नका. मुलांबरोबर मुलींसाठी हे अधिक महत्वाचे आहे. शाळांमध्ये आणि परिसरात सीसीटीव्ही बसवून घ्या. त्यामुळे अशा गुन्ह्यांना चाप बसले आणि गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होईल. सायबर सुरक्षाबाबतही खबरदारी घ्या. कोणालाही आपली इत्ंयभुत माहिती देऊ नका. काही घटना घडताना दिसली तर ११२ हा टोलफ्री क्रमांक डायल करा. तुम्हाला तत्काळमदत मिळेल.

सहायक आरटीओ श्री. ताम्हणकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सुरक्षा समिती स्थापन आहे. नियमांचे पालण करूनच स्कुल बसमधून विद्यार्थी वाहतुक करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला महत्त्व देऊन पोलिसांच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.