औरंगाबाद : महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा देशात सर्वाधिक असतानादेखील डोळ्यावर कातडे पांघरून वसुलीबाजांची पाठराखण करणारे आता सत्ता गेल्यावर जागे झाले आहेत . राज्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढल्याबद्दल चिंता व्यक्त करणारे विरोधी पक्षनेते अजित पवारांना या आकड्याचा सत्ताकाळात विसर पडला होता . ते आघाडीच्या अपयशाचे खापर युती सरकारवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत . ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाचे हे पाप आहे , असा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला . राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्याचे अजित पवार म्हणाले , ते खरे आहे . पण हा आकडा ठाकरे सरकारच्या काळातील होता हे सत्य त्यांनी दडवले आहे . सन २०२०-२१ मध्ये देशात घडलेल्या आत्महत्यांपैकी सर्वाधिक म्हणजे २,५६७ घटना ह्या एकट्या महाराष्ट्रात घडल्या आहेत . त्या वेळी ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतो , हे आता अजित पवार विसरून गेले आहेत , असा टोला बागडे यांनी लगावला . शेतकरी आत्महत्यांची ही आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंद संस्थेने ( एनसीबीआर ) जाहीर केली आहे