• प्रशासकीय कामासोबत आपल्या भागातील ऐतिहासिक वारसे जतन करावेत
परभणी, दि.7: महसुल विभाग हा शासनाचा प्रमुख विभाग असुन, यात प्रशासनाचा भाग म्हणून सेवा बजावण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे शासनाचा एक प्रमुख घटक म्हणून आपली जबाबदारी ओळखुन महसुल विभागाने नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महानगरपालिकेचे आयुक्त तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिपचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. केंद्रेकर पुढे म्हणाले की, सर्व सामान्य नागरिक हा अनेक अडचणीना सामोरे जात उभे राहण्याच्या प्रयत्न करत असतो. अशा नागरिकांची कामे महसूल विभागाशी निगडीत असल्यास त्याला अधिक त्रास किंवा अडचणीचा सामना करावा लागतो. सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न हे अत्यंत साधे असतात. आपल्या व्यवस्थेकडून ते अधिक कठिण होणार नाहीत याची प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांनी मानवी संवेदना जपत काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक महसूली प्रकरणात अडकलेली भांडणे वर्षानुवर्षे सुरु असलेली आपण नेहमीच पाहतो. यात त्या कुटूंबाला जे काही सहन करावे लागते त्याचा विचार आगोदर महसूल अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. महसूल विभागाच्या कामकाजात ‘ई ’ फेरफार, ई-पीक पाहणी, सातबारा, शासकीय जमिनीचे अभिलेखे व नोंदीमध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन पारदर्शकपणे नागरिकांना महसूल विभागाने सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्पष्ट करून ई-फेरफार, हद्दपार याबाबतचे न्याय देण्याची कारवाई खूप अभ्यासून केली पाहिजे. महसूल जमा करण्यामध्ये वाळू उपसा, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण रोखण्याबरोबरच भाडेपट्ट्यावरील जमिनीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्यासाठी अधिकचे लक्ष देण्याचे सांगितले. जमिनीबाबतच्या अर्धन्यायिक प्रकरणामधील सुनावणी लवकरात लवकर करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने जिल्ह्यात उपक्रम राबवावेत. महसूल विभागाकडे येणाऱ्या प्रत्येक फाईल तसेच अर्जांवर कार्यवाही करुन नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीचे कामकाज देखील अत्यंत काळजीने व अभ्यासून करावे. वृक्ष लागवडीसाठी घर तिथे नर्सरी उपक्रमातंर्गत प्रत्येक घरात किमान 50 झाडे तयार करुन त्याचे वृक्ष लागवड करावीत. पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांसाठी मार्गदर्शिका तयार करावी असे निर्देशही श्री. केंद्रेकर यांनी यावेळी दिले.
तसेच जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक व धार्मिक स्थळे तसेच बारव असुन याची माहिती जिल्ह्या गॅझेटीयर मध्ये उपलब्ध आहे. शासन सेवेत प्रशासनाचा भाग म्हणून काम करत असताना आपल्या अधिनस्त क्षेत्रातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची छायाचित्रासह माहिती तयार करावी. तसेच या ऐतिहासिक वारसाची लोकसहभागातून कसे जतन कसे करता येईल, तसेच हे वैभव पुढच्या पिढीपर्यंत कसे पोहचवता यासाठी प्रयत्न करावे.
बैठकीच्या सुरवातीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नुतन सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने तयार केलेल्या विज्ञान दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.
यावेळी बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महसूल विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालीका, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पशुसंवर्धन विभाग इत्यादी विभागांचा आढावा घेतला.
यावेळी बैठकीस उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, आणि विविध विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.