संगमेश्वर : लंपी स्किन आजाराच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर परिसरातील ९९ टक्के जनावरांच्या लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जनावरांच्या मालकांनी आता आवश्यक ती काळजी घेऊन रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहायक पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मनोहर ढाकणे यांनी केले आहे.
आजाराच्या पार्श्वभूमीवर छावा मराठा योद्धा संघटनेचे जिल्हाध्यक्ष वहाब दळवी यांनी आढावा घेतला. गाय, बैल, म्हैस या जनावरांना आजारापासून वाचविण्यासाठी डॉ. ढाकणे यांनी लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. रोगाचा प्रादुर्भाव झालेले एकही जनावर अद्यापपर्यंत आढळलेले नाही. कसबा, भिरकोंड, साखळकोंड, असुर्डे आदी भागातील ३०० जनावरांच्या लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लसीच्या उपलब्ध साठ्यानुसार लसीकरण करण्यात येणार आहे. मोकाट गुरांच्या मालकांनी आपली जनावरे गोठ्यात बांधून ठेवावी व लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. मनोहर ढाकणे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सुचनेनुसार जनावरांच्या लसीकरणाची मोहीम संगमेश्वर तालुक्यात धडकपणे राबवली जात आहे. तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी बी. बी. चौगुले यांनी प्रत्येक गावातील सरपंचांना आजारासंदर्भात जनजागृतीचे आदेश दिले आहेत. संस्कार वाहिनीच्या मदतीने शेतकऱ्यांना लंपी स्किन आजाराबाबतची माहिती देऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर केले जात आहेत.