राजापूर: तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चक्क पोलिसाला आत्महत्या करण्याची वेळ का आली असा प्रश्न येथील लोकांना पडला आहे. पोलीस नाईक मंगेश सीताराम राडये असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. राड्ये यांची एका प्रकरणात चौकशी सुरू होती. त्यांना समजपत्र देण्यात आले, मात्र समजपत्र न स्वीकारता त्यांनी नाटे पोलीस ठाण्यात येऊन प्रभारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर गोंधळ घातला. 

मंगेश सीताराम राडये यांनी आपल्यावरील कारवाई चुकीची आहे, असे सांगत प्रभारी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलीस स्थानकाच्यासमोर उभे असलेल्या युनिकॉर्न गाडीतील नायलॉनची दोरी घेऊन गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब नंदकुमार पाटील यांनी याबाबतची फिर्याद नोंदविली आहे.