लांजा : दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज कोकण रेल्वे मार्गावर लांजानजीक आडवली स्टेशन नजीक दरड कोसळल्याची घटना घडली. दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतुक कोलमडली होती. दरड बाजुला केल्यानंतर दोन तास उशिराने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक सुरळीत झाली.
कोकण रेल्वेच्या आडवली रेल्वे स्थानकजवळ शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान दरड कोसळल्याने मुंबई व मडगावच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या दोन तास उशिराने धावल्या. सध्या दोन दिवसापासून परतीचा पाऊस सुरू झाला असुन त्याचा फटका शुक्रवारी कोकण रेल्वेला बसला. शुक्रवारी सकाळी ११ वा. दरम्यान दरड कोसळताच मुंबई व मडगावच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना रत्नागिरी व विलवडे रेल्वे स्थानकात थाबविण्या आले होते. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळा पत्रक काहीकाळ कोलमडले होते. ट्रॅकवरील कोसळलेली दरड बाजु करण्याचे काम सुरू असल्याने सावंतवाडी - दिवा गाडीला विलवडे रेल्वे स्थानक येथे तर राजधानी गाडीला निवसर रेल्वे स्थानकात थांबविण्यात आले होते. दरड बाजुला केल्यानंतर दोन तासानी दोन्ही गाड्यांना पुढील प्रवासाला पाठविण्यात आले. समजलेल्या माहितीनुसार जोरदार पाऊस व दरड कोसळल्याने कमी वेगाने गाड्या धावत असल्याचे समजते.