शिवाजीराव पंडित अभिष्टचिंतन सोहळ्याचा भव्य शुभारंभ
रामराव ढोक महारांच्या सुश्राव्य वाणीने उपस्थित श्रोते झाले मंत्रमुग्ध
गेवराई दि.६ (प्रतिनिधी) जिवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे रामकथा आहे. देशात एकात्मता आणायची असेल तर घरा घरातली एकता टिकवली पाहिजे. घरातील एकता टिकवून ठेवायची असेल तर भावा-भावा मध्ये प्रेम असले पाहिजे आणि त्यासाठी रामकथा ऐकली पाहिजे. शिवाजीराव दादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने ही रामकथा आयोजित करुन पंडित परीवार मोठे परोपकार्य करत आहे असे गौरवोद्गार रामाणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी काढले. माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने आज गेवराईत रामाणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या संगीत रामकथेस भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. प्रारंभी उपस्थित संत महंत यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य किर्तन महोत्सवास प्रारंभ झाला.
माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या किर्तन महोत्सवाला गुरुवार दि.६ रोजी मोठ्या थाटामाटात भव्य शुभारंभ करण्यात आला. ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर, ह. भ. प. नवनाथ महाराज आदी संतमहंताच्या शुभहस्ते कलश पुजन करुन किर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी रामराव महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून संगित रामकथा मंगलयम आणि भक्तीमय वातावरणात सुरु झाली.
प्रारंभी शिवाजीराव पंडित यांनी रामराव ढोक महाराज यांचा आदरपूर्वक सत्कार केला. रामायनाचार्य रामराव महाराज ढोक, ह.भ.प नवनाथ महाराज गोरक्षनाथ टेकडी, ह. भ. प. अक्रूर महाराज साखरे, ह.भ. प. दत्ता महाराज गिरी, तालमहर्षी ह.भ.प. उद्धवबापू आपेगावकर, ह. भ. प. रामेश्वर महाराज राऊत, ह.भ.प. रामानंद पवार महाराज यांच्या शुभहस्ते कलश आणि प्रतिमा पूजन करण्यात आली. यावेळी ग्रंथपुजा आणि आरती करण्यात आली. रामकथेतील वादक काशिनाथ पाटील, गायनाचार्य संंतोष महाराज आणि संजय मस्के यांच्या सुश्राव्य गायन वादनाने वातावरण मंगलमय झाले होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, रणवीर पंडित यांच्यासह अभिष्टचिंतन सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कथेच्या प्रारंभ प्रसंगी बोलताना ढोक महाराज म्हणाले की, या वयात दादांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की त्यांनी त्यांच्या जिवनात केलेले परोपकार्य दिसून येते. दादांच्या जिवनात कोणतेही अनिष्ठ येऊ नये म्हणून हितचिंतकांनी केलेले ईष्ट कार्य म्हणजे अभिष्टचिंतन सोहळा आहे. या पुर्वी अमरसिंह पंडित यांनी गेवराई शहरात रामकथेचे आयोजन केले होते, आता पुन्हा एकदा रामकथेचे आयोजन केले आहे, ही मोठी समाधानाची बाब आहे असेही ते म्हणाले. आपल्या सुश्राव्य वाणीतून त्यांनी रामकथा सांगताना अनेक प्रसंग सांगितले. बारा तारखेपर्यंत हे तत्वज्ञान सगळ्यांनी श्रवण करावे असेही ते म्हणाले.
रामकथेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. प्रामुख्याने महिला भावीकांची संख्या जास्त होती. अभिष्टचिंतन सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.