रत्नागिरी : रत्नागिरीत पुन्हा एक रेल्वे ट्रॅकवर 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पानवल रेल्वे ट्रॅकवर छिन्न विच्छिन्न अवस्थेत तुकडे झालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास दिवा सावंतवाडी एक्स्प्रेसच्या धडकेत या तरुणाचा मृत्यू झाला.
सुमित राजेश सावंत (20, मजगाव, बौद्धवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेल्वे ट्रॅक च्या पुलाच्या पलीकडे त्याच्या देहाचे तुकडे तुकडे दिसून आले. याबाबतची फिर्याद मंदार पवार (35, खेडशी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली.
दरम्यान या तरुणाच्या मृत्यू म्हणजे आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. 15 दिवसापूर्वीच आरटीओ कार्यालयासमोरील रेल्वे ट्रॅकवर दोन तरुणांनी रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा तशीच घटना घडल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. रत्नागिरीत दिवसेंदिवस आत्महत्या, खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शांत असलेली रत्नागिरी गणपती उत्सवापासून अनेक घटनांनी गाजते आहे.