बीड- ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुधवारी सकाळी शहरातून धम्म रॅली काढण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पंचशील ध्वजारोहण झाले. रॅली व अभिवादन कार्यक्रमास समता सैनिकांसह इतर प्रतिष्ठित नागरिक, समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बीड शहरातील बसस्थानकाशेजारी असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा कार्यालयासमोरून रॅलीस सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बशीरगंज, बलभीम चौक, माळीवेस मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे येऊन थांबली. त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विष्णू कांबळे यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर ध्वज वंदना, बावीस प्रतिज्ञा, तिशरण-पंचशील-अष्ठगाथा, भीम स्मरण, शरणात घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे एस. एस. शिंदे, गौतम खेमाडे, गौतम सोनवणे, सदाशिव कांबळे, शिवाजी वावळकर, राजेंद्र ससाणे, सरस्वती जाधव, पद्मिनी गायकवाड, जाधव कांताबाई, पूनम जोगदंड, स्वाती धन्वे, शोभा साळवे, तालुकाध्यक्ष प्रा. बाळासाहेब शिंदे, सरचिटणिस विश्वंभर बनसोडे, सिद्धार्थ जगझाप यांच्यासह समता सैनिक, बौद्धाचार्य, श्रामनेर व इतर प्रतिष्ठित नागरिक, समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.