जयभवानीचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न

गेवराई प्रतिनिधी) जयभवानी कारखान्याच्या यंत्रसामग्रीमध्ये मोठ्याप्रमाणावर बदल करण्यात आले आहेत, अत्याधुनिक पद्धतीची यंत्रसामग्री बसवल्यामुळे कारखानाची कार्यक्षमता वाढली असून कारखान्याचा उत्पादन खर्च कमी करून ऊसाला जास्त भाव देण्याचे नियोजन आम्ही करत आहोत, इतर कारखान्याबरोबर ऊस दरासाठी जयभवानी स्पर्धा करण्यासाठी सक्षमपणे तयार झाला आहे, इतर कारखान्यांच्या तुलनेत जय भवानी ऊसाला सरस भाव देईल असे प्रतिपादन जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. कारखान्याच्या ४० व्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते.

जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे ह. भ. प. महादेव महाराज यांच्या शुभहस्ते आणि कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पंडित, चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी माजी अध्यक्ष जयसिंग पंडित, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, भवानी बॅंकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे यांच्यासह संचालक पाटीलबा म्हस्के, भाऊसाहेब नाटकर, श्रीहरी लेंडाळ ,अप्पासाहेब गव्हाणे, अर्जुन खेडकर, सुनिल पाटील, श्रीराम अरगडे, शिवाजी कापसे, साहेबराव पांढरे, राजेंद्र वारंगे, डॉ. आसाराम मराठे, संदीपान दातखीळ, जगन्नाथ दिवाण, कुमारराव ढाकणे, शाम मुळे, विकास सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

 पुढे बोलताना चेअरमन अमरसिंह पंडित म्हणाले की, कारखान्यात अत्याधुनिक पद्धतीची यंत्रसामग्री बसवल्यामुळे कार्यक्षमता वाढणार असून त्यांचा फायदा होणार आहे. प्रतिदिन गाळप क्षमता वाढणार आहे. भविष्यकालीन गोष्टीचा विचार करून आता आपल्याला साखरेवरचे अवलंबित्व कमी करून इतर उपउत्पादनाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. डिसलरी, इथेनॉल आणि सीएनजी कडे आपण आता जास्त लक्ष देणार असून त्यामुळे या उत्पादनातून कारखान्याचा फायदा वाढणार आहे. यामुळे येणाऱ्या काळामध्ये सभासद शेतकरी बांधवांच्या पदरात जास्तीचा भाव पडणार आहे. यावर्षी सर्व बाबींचा विचार करून जास्तीत जास्त भाव देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून हा भाव निश्चितच २३०० रुपयांच्या वर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गतवर्षी अडसरीच्या उसाला ३०० रुपये देण्याचे जाहीर केले होत, ते यावर्षी दिले जाईल असेही ते म्हणाले. कारखान्याचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई येथे पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या निमित्ताने आयोजित केलेल्या राम कथा ज्ञानयज्ञ आणि कीर्तन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी ह.भ. प. महादेव महाराज यांनी आपल्या शुभाशीर्वादपर भाषणात जयभवानी कारखान्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जय भवानी कारखाना हा गेवराई तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी कामधेनू असून जय भवानीची प्रगती असेच उत्तरोत्तर होत जाईल आणि संपूर्ण जगामध्ये जयभानीची साखर पोहोचेल असेही ते यावेळी म्हणाले. 

कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कारखान्याच्या मागील गळीत हंगामातील कामगिरीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप यांनी मानले. यावेळी शेतकी अधिकारी जगन्नाथ शिंदे, चीफ इंजीनियर अशोक होके, ऋषिकेश देशमुख, प्रॉडक्शन मॅनेजर गजानन वाळके, मुख्य लेखापाल सौरभ कुलकर्णी, लेबर ऑफिसर संदीप भोसले, परचेस ऑफिसर सोळुंके, संगणक प्रमुख धनाजी भोसले, डिस्टीलरी इन्चार्ज राजेंद्र बडे, सर्व खाते प्रमुख, पदाधिकारी, ऊस बागायतदार, ऊस तोडणी ठेकेदार, कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.