औरंगाबाद : सध्या दहावी - बारावी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे . या प्रक्रियेत १७ नंबरचा अर्ज भरून खासगी पद्धतीने परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्काची मागणी होत असल्याच्या तक्रारी विभागीय मंडळास प्राप्त झाल्या आहेत . विद्यार्थ्यांचा परीक्षा फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी संपर्क केंद्रांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी करत असल्याचा आरोप बालहक्क कृती समिती व १७ नंबरचा फॉर्म भरणाऱ्यांनी केला आहे . सामाजिक , आर्थिक , कौटुंबिक किंवा वैयक्तिक समस्यांमुळे शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देण्याची सुविधा राज्य मंडळाने उपलब्ध करून दिली आहे . मात्र , परीक्षा फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची गैरसोय होत आहे . सायबर कॅफेतही अधिकचे शुल्क घेतले जात आहे . तसेच अर्ज भरून संपर्क केंद्राकडे गेल्यावर पूर्वपरवानगीशिवाय केंद्राची निवड का केली , असा सवाल करत संबंधित विद्यार्थ्याकडून अतिरिक्त शुल्काची मागणी केली जात आहे . संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज विभागीय मंडळात जमा करून घेण्यास मंडळाधिकारी नकार देतात , अशी माहिती १७ नंबरचा अर्ज भरणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी दिली