बीड तालुक्यात शेतकरी आंदोलन समितीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी एकजुटीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहेत. बीड जिल्ह्याला अग्रिम पीकविमा व नुकसान भरपाई मिळणार नाही, कापूस व सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत. शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. यामुळे शेतकरी आंदोलन समिती आंदोलन उभे करणार असून त्याबाबत निर्णय घेणारी प्रातिनिधिक बैठक आज दिनांक 05 ऑक्टोबर रोजी बीड येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती शेतकरी आंदोलक धनंजय गुंदेकर यांनी दिली आहे.
बीड तालुक्यातील 16 पैकी 12 मंडळांना व जिल्ह्यातील 47 मंडळांना अग्रिम पीकविमा 3 टप्प्यात मंजूर करण्यात आला मात्र आता नफेखोरी करत असलेली पीकविमा कंपनी एकही मंडळास पीकविमा देण्यासाठी तयार नाही. बीड जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने काही ठिकाणी नुकसान झाले मात्र नुकसान भरपाई रकमेत जिल्ह्याला ठेंगा दाखवला गेला. कापूस अन् सोयाबीन हे जिल्ह्यातील मुख्य पिक आहेत. ही उत्पादने बाजारात येण्या आधीच भाव गडगडले आहेत. दसऱ्याला सोने लुटतात मात्र जिल्ह्यात तर नवरात्रात शेतकरीच लुटला जात आहे म्हणून आज बीड येथे शेतकरी पूत्रांची प्रातिनिधिक बैठक आयोजित करण्यात आलेली असून या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे शेतकरी आंदोलक धनंजय गुंदेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हंटले आहे.