संगमेश्वर : पंचायत समिती संगमेश्वर शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी रविंद्र किंजळे यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील काढले. ते रवींद्र किंजळे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी बोलत होते. मानसकोड किंजळेवाडीचे रहिवासी असलेले तसेच शिक्षण क्षेत्रातील विस्तार अधिकारी रवींद्र किंजळे यांनी आपल्या शिक्षकी सेवेला चिपळूणमधील कोकरे या शाळेत सुरुवात केली. त्यानंतर धामापूर नं. 5, तळेभाग, वांद्री कुणबीवाडी, कोंड नं. 2 येथे कार्य केले. उपशिक्षक, उच्चश्रेणी, मुख्याध्यापक ते शिक्षणविस्तार अधिकारी अशा विविध पदावर त्यांनी काम करत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात विविध पदावर कार्यरत आहेत.
संगमेश्वर येथे झालेल्या या कार्यक्रमात विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवणे यांनी आपल्या मनोगतातून म्हणाले की, किंजळे यांनी ज्या ज्या शाळेत काम केले तेथे विद्यार्थी शाळा, समाजाच्या विकासासाठी योगदान देणारे उपकम राबवले. शांत, संयमी असणारे हे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले. त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात रवींद्र किंजळे यांचा शिक्षण विभागाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समूहसाधन केंद्राच्यावतीनेही शाल, श्रीफळ भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी पाटील, विस्तार अधिकारी त्रिभुवणे, सायली शिंदे, विनायक पाध्ये, केंद्रपमुख मोहन कनवजे, रामचंद्र कुवळेकर, डॉ. मनोज किंजळे, तसेच शिक्षण विभागातील व समूहसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी वृंद तसेच रवींद्र किंजळे यांची पत्नी वांद्री शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी किंजळे, मुलगा डॉ. मनोज, स्नुषा डॉ. मोनिका, मुलगी डॉ. मुग्धा उपस्थित होते.