केज (प्रतिनिधी) केज येथे पिक विम्याच्या मागणी आणि नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आपल्या मागण्यांचे निवेदन हे रेड्याला देऊन सरकारचा आणि विमा कंपनीचा निषेध नोंदवण्यात आला.
केज येथे दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वा. छत्रपती शिवाजी चौकात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि स्वाभिमानीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.सोयाबीन पिकाला ८०% पीक विमा लागू करावा. पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रु। प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे. ई-पीक पाहाणी व नुकसानीची माहिती मोबाईल वरून ऑनलाईन ऐवजी ऑफ लाईन पद्धतीने स्विकारण्यात यावेत. या मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोराळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमर पाटील, पशुपतीनाथ दांगट, प्रवीणकुमार शेप, किसन कदम, कपिल मस्के, भाऊसाहेब गुंड, अशोक गित्ते, सुधीर चौधरी, महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भागवत पवार, जमील पटेल, मुकुंद कणसे, दलील इनामदार, समीर देशपांडे, विनोद शिंदे, वसंत भांगे, विश्वास जाधव, युवराज मगर, सांगळे, बंडू इंगळे, कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून सरकार आणि विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या मागण्या केल्या.
आंदोलनात रेड्यानी वेधले लक्ष ! या आंदोलनात सरकार आणि विमा कंपन्या यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी दोन रेड्यांच्या अंगावर मजकूर लिहिलेल्या रेड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले
विमा कंपनी आणि सरकारच्या नावाने गोंधळ ! या स्वाभिमानाच्या एका कार्यकर्त्याने गोंधळ्याचा वेष परिधान करून हलगी आणि झणजे झांजेच्या तालावर ठेका धरीत सरकार आणि विमा कंपन्यांच्या नावाने गोंधळ घातला.
सरकारी अधिकाऱ्या ऐवजी रेड्याला दिले मागण्यांचे निवेदन ! आंदोलकांनी सरकार आणि विमा कंपन्या वरील त्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी मागण्यांचे निवेदन हे सरकारी अधिकाऱ्यांना न देता चक्क आंदोलनात आणलेल्या रेड्यांला निवेदन देत सरकारी यंत्रणेवर रोष व्यक्त केला.