गुहागर : वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत शक्तीतुरा स्पर्धेचे आयोजन रामपूर गुढे फाटा या ठिकाणी करण्यात आले होते. या दोन दिवशीय स्पर्धांमध्ये एकूण १२ नृत्य संघांनी सहभाग घेतला होता. त्यामधून विठ्ठल रखुमाई नाच मंडळ मालघर तेलेवाडी शक्तीवाले शाहीर राजेंद्र पवारसह रितेश भोसले हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत तर द्वितीय क्रमांक सोनगाई नृत्य कलापथक काळसुर कौंढर तुरेवाले विनेश तांबे यांनी पटकावला आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले शिवसाई नाच मंडळ कुशिवडे तुरेवाले शाहीर एकनाश डिके या तिन्ही संघांना वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांनी क्रमांकानुसार रोख रक्कम देत त्यांचा गौरव केला.

यावेळी रसिक प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद देऊन या स्पर्धेचा दोन दिवस आनंद घेतला होता. कलेतून प्रबोधन साधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कोकणातील शक्तीतुरा या लोककलेचे आयोजन स्पर्धात्मक स्वरूपात केले होते. या स्पर्धेमध्ये कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूण यांनी पंचांची उत्तम भूमिका निभावत या स्पर्धेला यशाच्या उंचीवरती नेऊन ठेवले. दि. २४ व २५ रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या. दोन दिवशीय लोककलेच्या सोहळ्यामध्ये एकूण पहिल्या दिवशी सात आणि दुसऱ्या दिवशी पाच नृत्यसंचांनी आपली कला सादर केली. एकूण १२ संच या स्पर्धेत उतरले होते. खेड, दापोली, गुहागर व चिपळूण या तालुक्यातून नृत्य संचांनी आपली कला सादर करण्यासाठी सहभाग नोंदवला होता.

कार्यक्रमाबाबत बोलताना अण्णा जाधव यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत शक्तीतुरा लोककला स्पर्धेत दापोली शाहीर पप्या जोशी यांच्या संचात दोन मुली नृत्य करण्यासाठी असल्यामुळे हा संघ स्पर्धेतून बाद केला. कारण कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूण यांच्या नियमाप्रमाणे शक्ती -तुरा स्पर्धा ही फक्त पुरुषप्रधान कला म्हणून पूर्वीपासून ओळखली जाते. मात्र पहिल्यापासून इच्छा होती. ती नकळत दापोली शाहीर पप्या जोशी यांच्या संचाने पूर्ण केली. भले ते स्पर्धेत सहभागी होऊ शकत नसले तरीही आयोजक म्हणून आम्ही त्यांचा उचित सन्मान केला कारण समतेचा विचार वंचित बहुजन आघाडी घेऊन पुढे जात आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला २५ हजार रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन जिल्हाध्यक्ष विकास अण्णा जाधव यांनी सन्मानित केले त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाला रोख १५ हजार रुपये, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देण्यात आले तर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाला रोख रक्कम १० हजार रूपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय उत्कृष्ट संच म्हणून सुखकर्ता नाच मंडळ कोडमंळा शाहीर अजय राडे यांना वैयक्तिक पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट ढोलकी पट्टू ठरलेले ख्यातनाम ढोलकी पट्ट पांडुरंग सुतार, तर उत्कृष्ट गायक म्हणून काळसूर कौंढर गुहागर येथील विनेश तांबे यांना गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा, तालुका व विभागस्तरावरील कार्यकत्यांनी मेहनत घेतली.