बीड तालुक्यातील मौजे. लिंबागणेश येथील सार्वजनिक स्मशानभुमी दुरावस्थेत असून मोडकळीस आलेले पत्र्याचे शेड,तुटलेले अंगल आणि आजूबाजूस वाढलेली झाडेझुडपे यामुळे पावसाळ्यात मृतदेहाची हेळसांड होत असून अंत्यसंस्कार दरम्यान विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळेच मौजे लिंबागणेश येथिल स्मशानभुमीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून स्मशानभुमी बांधण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दि.७ ऑक्टोबर रोजी लिंबागणेश येथील सार्वजनिक स्मशानभुमीत सरण रचुन ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड,गटविकास आधिकारी पंचायत समिती बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री,विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना दिला आहे. 

बीड जिल्ह्य़ातील १३९४ गावापैकी ६५६ गावामध्ये स्मशानभुमीची सोय नाही तसेच ६३८ गावात स्मशानभुमी असली तरी अत्यंत दुरावस्थेत असून पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना मोठ्याप्रमाणात अडचणी येत असून त्यासाठी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.०४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक "पिंडदान आंदोलन "करण्यात आले होते. संबधित प्रकरणात जिल्हाधिकारी बीड यांनी मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांना आदेश देऊन नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत पत्रक काढले होते परंतु त्यात सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही.