रत्नागिरी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनमान्य आर्थिक मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्ह्यातील कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आज जि.प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करीत आहेत.

जिल्हा स्तरावरील काही शासनस्तरावरून मंजुर झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही असा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दावा आहे. यामध्ये किमान सुधारित वेतन दर लागू करणे, राहणीमान भत्याची अदाई करणे, भविष्यनिर्वाह निधीचे खाते अद्ययावत करणे तसेच काही ठिकाणी सेवा पुस्तिका सुध्दा अद्ययावत नोंदीने परिपूर्ण करण्यात आलेल्या नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ही सेर्व सेवा पुस्तके अद्ययावत करण्याबाबतची कार्यवाही करणे, तसेच शासनाकडील निर्देशानुसार संघटनांचे प्रतिनिधी समवेत स्वतंत्र समन्वय बैठकीचे आयोजन करणे या सर्व बाबीसंदर्भात आपल्या स्तरावर योग्य पध्दतीने अंमलबजावणी होत नाही, असा कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. त्यामुळेच हे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात आले.