रत्नागिरी : शहरातील फगरवठार येथून शुक्रवारी बेपत्ता झालेल्या महिलेचा आज सोमवार 3 ऑक्टोबर रोजी मृतदेह आढळून आला. कपल पॉइंट खाली २०० फूट खोल दरीत तिचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला.

     

पोलिसांनी सायंकाळी उशिरापर्यंत माउंटेनिअर्स असोसिएशनच्या पथकाच्या मदतीने तिचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. दरम्यान घातपाताच्या शक्यतेने या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

तन्वी घाणेकर हीचा पती रितेश घाणेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची खबर दिली होती. त्यांनी म्हटले होते की, गुरुवारी त्यांची पत्नी तन्वी घाणेकर (३३, रा. खालचा फगरवठार, रत्नागिरी) ही सायंकाळच्या सुमारास मुलगी आनंदी हिला, मी बाजारात जावून येते. उशिर झाला तर जेवण करुन घ्या, असे सांगून गेली होती. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत ती घरी न आल्याने पती रितेशने शहर पोलीस ठाण्यात खबर दिली होती. पोलिसांनी तपासाला गती देत एमआयडीसी येथील एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या तरुणाची चौकशी केली. त्याला चौकशी साठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर त्याला सोडून देतात आले. अधिक तपास करत असताना शहर पोलिसांना तन्वी घाणेकर हिची दुचाकी भगवती किल्ला नजीक आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी आत्महत्येच्या दृष्टीने तपास केला. कपल पॉइंट, टकमक टोक, सारा किल्ला परिसर पिंजून काढला. मात्र काहीच हाती लागले नाही. दोन दिवस शोध मोहीम सुरू होती. मात्र या तपासादरम्यान तिच्या मोबाईलचे लोकेशन पावस परिसराच्या आसपास सापडत होते. दरम्यान आज सोमवारी सकाळपासूनच पोलिसांनी समुद्राच्या बाजूने शोध मोहिम केली. आणि सायंकाळच्या सुमारास कपल पॉईंट खाली सुमारे २०० फूट दरीमध्ये ट्रेकरच्या सहाय्याने शोधाशोध केल्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, पोलीस निरीक्षक शांताराम महाले, पोलीस नाईक विलास जाधव, पो. ना. दिपराज पाटील, पो. ना. वैभव नार्वेकर, पो.ना. प्रवीण पाटील या धाडसी पोलिसांच्या टीमने मृत्युदेह २०० फूट खोल दरीतून बाहेर काढला.

 नातेवाईकांनी तिचा मृतदेह ओळखला. मात्र पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मृतदेह भगवती बंदर येथे सापडला? दुचाकीही तिथेच सापडली पण मोबाईल लोकेशन शहराच्या बाहेर कसे? यावरून तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तर नाही ना केले? किंवा मोबाईल त्या ठिकाणाहून चोरीस तर गेलेला नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस सर्व दृष्टीने तपास करत आहेत. ही नेमकी आत्महत्या की घातपात अशी चर्चा सुरू आहे.