रत्नागिरी : शहरातील फगरवठार येथून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह भगवती किल्ल्यासमोरील कपल पॉइंट खाली २०० फूट खोल दरीत आढळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी उशिरापर्यंत माउंटेनिअर्स असोसिएशनच्या पथकाच्या मदतीने तिचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. दरम्यान घातपाताच्या शक्यतेने या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रितेश घाणेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली होती. त्यानूसार, गुरुवारी त्यांची पत्नी तन्वी घाणेकर ३३, रा. खालचा फगरवठार, रत्नागिरी ही रोजी सायंकाळच्या सुमारास मुलगी आनंदी हिला, मी बाजारात जावून येते. उशिर झाला तर जेवण करुन घ्या, असे सांगून एमएच ०८ एक्स ७११७ दुचाकी वरुन बाजारात गेली होती. दुसर्या दिवशी दुपारपर्यंत ती घरी न आल्याने पती रितेशने दुसऱ्या दिवशी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली होती.
याप्रकरणी तपास करताना शहर पोलिसांना तन्वी घाणेकर हिची दुचाकी भगवती किल्ला नजीक आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातच शोध मोहीम सुरु केली. अखेर सोमवारी सकाळपासूनच भगवती किल्ला, कपल पॉईंट, टकमक पॉईंट, लाईट हाऊस परिसरात समुद्राच्या बाजूने शोध मोहिम केली. आज सोमवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी भगवती किल्ल्यासमोरील कपल पॉईंट खाली सुमारे २०० फूट दरीमध्ये जाऊन शोधाशोध केल्यानंतर एका महिलेचा मृतदेह आढळून आला.
मृत्यू मृतदेह ज्या ठिकाणी आहे तेथून बाहेर येण्यासाठी मार्ग नसल्याने माउंटेनिअर्स असोसिएशनच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला. दरम्यान तीचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मुतदेह आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.