सर्व स्तरातील भ्रष्टाचार, अन्याय आणि दडपशाही निपटून काढण्यासाठी शांततामय आणि लोकशाही मार्गाने आंदोलन उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे चारित्र्यशील कार्यकर्ते समाजात उभे राहिले पाहिजेत. त्यांचे संघटन झाले तरच महात्मा गांधींच्या म्हणण्या प्रमाणे स्वराज्याचे सुराज्य होण्यास वेळ लागणार नाही, असे मत ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले.

          जनआंदोलनाच्या अंबाजोगाई येथील कार्यकर्त्यांसाठी नूतन योगेश्वरी विद्यालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जन आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन मस्के, धारूर तालुका अध्यक्ष संदीपान थोरात, अँड. सुभाष शिंदे, तुषार पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

           अँड. देशमुख पुढे म्हणाले की, तन, मन आणि धनाने विचारपूर्वक कार्य करणाऱ्या अभ्यासपूर्ण कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी जन आंदोलनाची स्थापना झाली असून जनआंदोलनाच्या माध्यमातून आज तागायत शेकड्यावर मोठ-मोठी कामे झालेली आहेत. अण्णांच्या आंदोलनामुळे माहिती अधिकार, बदल्या, दप्तर दिरंगाई, दारूबंदी, ग्रामसभा यासारखे कायदे आणि कायद्यात दुरुस्त्या झाल्या आहेत. लोकपाल कायदा आला असून आता लोक आयुक्त कायदा देखील येणार आहे. त्यामुळे साखळी पद्धतीने होणारा भ्रष्टाचार थांबण्यास मदत होईल. मात्र यासाठी सक्रिय कार्यकर्त्यानी समाजासाठी वाहून घेणे गरजेचे आहे.

           सध्या सामान्य माणूस भ्रष्टाचारामुळे पोखरून निघत आहे. सूराज्य निर्माण करण्यासाठी शासन आणि प्रशासन पाहिजे तेवढे लक्ष देत नाही. त्यामुळे गावागावात शब्दाला वजन असणारे चारित्र्यशील कार्यकर्ते समाज बांधणीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. आता सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य जनतेने हाती घेतले पाहिजे. तरच देशाचा विकास होईल, असे ही देशमुख म्हणाले.

         यावेळी जिल्हाध्यक्ष गोवर्धन मस्के, , अँड. सुभाष शिंदे यांच्यासह संदीपान थोरात, लक्ष्मणराव गोरे, मदनराव मस्के, यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाला अंबाजोगाई तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. शिबिरात धन्यवाद बाजीराव देशमुख, रामकिसन मुळे, शिंदे, दामोदर हरिभाऊ थोरात, बालासाहेब रामचंद्र आवळे, दत्तात्रय रामभाऊ अंबाड, कोंडीबा शंकर राऊत, चव्हाण राजाभाऊ, बंकटराव भगत, प्राध्यापक राजरत्न देवरे, भगवान जाधव, विष्णू जाधव, प्रदीप व्यंकट काळे, अविनाश नवनाथ साखरे, साधू मुरलीधर जाधव, आत्माराम बळीराम पवार, देशमुख तुषार पाटील, पद्माकर दत्तात्रय सेलमोकर यांचेसह सर्व अन्य उपस्थित होते.