संभाजीनगर : उद्धव ठाकरे गटाप्रमाणे शिंदे गटातही युवा सेनेची बांधणी सुरू आहे . शिंदे गटाच्या युवा सेना प्रमुखपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांनी राज्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे . मात्र , स्थानिक संघर्षामुळे औरंगाबादची कार्यकारिणी काही ठरत नसल्याचे समोर येत आहे . राजेंद्र जंजाळ यांच्याकडे युवा सेनेचे राज्याचे उपसचिव पद होते . त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर युवा सेनेतील तीन शहरप्रमुख , १६ शहर उपप्रमुख , दोन जिल्हा उपप्रमुख शिंदे गटात गेले . आमदार प्रदीप जैस्वाल यांचे सुपुत्र ऋषिकेश यांच्याकडे महाविद्यालयीन कक्षप्रमुख पद होते . जंजाळ आणि जैस्वाल आता एकत्र जरी काम करत असले तरी त्यांच्यातील शीतयुद्ध शिंदे गटात गेल्यानंतरही सुरू असल्याची चर्चा आहे . जैस्वाल - जंजाळ यांच्याशिवायही अन्य संघर्ष आहेत . त्यामुळे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पद नेमके कोणाला द्यायचे हा प्रश्न आहे . जंजाळ गटाचा जोतिराम पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे तो या स्पर्धेतून बाद झाल्याचे सांगितले जाते