स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०२१-२२ मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये पुणे जिल्ह्यातील ५ शहरांनी विविध श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावून पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलेला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर संपन्न झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहर राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बारामती, लोणावळा, सासवड व इंदापूर नागरपालिकेस विविध श्रेणीमधील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
*'सर्वोत्तम नागरिक अभिप्राय’ यामध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात प्रथम*
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देश पातळीवर शहरांच्या स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात आले. नागरिकांचा प्रतिसाद अर्थात फिडबॅक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. त्यासाठी दिलेली लिंक ओपन करून त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. त्यामध्ये सर्वाधिक नागरिकांनी फिडबॅक नोंदवला असून योग्य उत्तरे दिल्याने शहराला देशामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला.
*स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये बारामती नगरपरिषद देशात नववी*
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये बारामती नगरपरिषदेला देशात नववा तर महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळाला आहे. तसेच १ ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरांमध्ये वेगाने कामगिरी करणारे शहर म्हणून पुरस्कार मिळवला आहे. बारामती शहराने स्टार वन आणि वॉटर प्लस मानांकन मिळवून चमकदार कामगिरी केली आहे. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
*सासवड नगरपालिका वेस्ट झोन मध्ये दुसऱ्या क्रमांकावर*
सासवड नगरपालिका वेस्ट झोन मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून सेल्फ सस्टेनेबल सिटी चा बहुमान देश पातळीवर मिळाला आहे. इंडियन स्वच्छता लीग मध्ये २५ ते ५० हजार लोकसंख्येमध्ये देशपातळीवर अव्वल क्रमांक पटकावला आहे. सासवडचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
*लोणावळा नगरपालिका देशपातळीवर चौथा क्रमांकावर*
लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी अव्वल राहून देश पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी लोणावळा नगरपालिकेला देशपातळीवर चौथा क्रमांक तर वेस्ट झोन मध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून मान मिळाला आहे. इंडियन स्वच्छता लीग मध्ये ५० हजार ते १ लाख लोकसंख्येमध्ये देश पातळीवर अव्वल क्रमांक मिळवला आहे. लोणावळाचे मुख्याधिकारी पंडीत पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
*इंदापूर नगरपालिकेला इंडियन स्वच्छता लीगमध्ये विशेष बहुमान*
इंडियन स्वच्छता लीग ही भारतातील पहिली आंतर-शहर स्पर्धा आहे ज्याचे नेतृत्व युवकांनी कचरामुक्त शहरे बनवण्याच्या दिशेने केले आहे. १७ सप्टेंबर रोजी हाती घेण्यात येणार्या उपक्रमांचे नियोजन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 'विशेष उल्लेखनीय गुणगौरव' या पुरस्काराने इंदापूर नगरपरिषदेचा गुणगौरव करण्यात आला. मुख्याधिकारी राम कापरे यांनी पुरस्कार स्वीकारला.
पुणे जिल्ह्यातील ५ शहरांना स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ अंतर्गत विविध श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील वर्षीही या अभियानांतर्गत नागरिकांच्या सहभागातून या वर्षापेक्षा चांगली कामगिरी होईल, असा विश्वास मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.