औरंगाबाद : सातारा परिसरातील पोलिस ठाण्याच्या मागील सह्याद्रीनगर , अर्थनगरात ड्रेनेजलाइनचे योग्य प्रकारे नियोजन केले नसल्याने वसाहतींत पाणी शिरत आहे . त्यामुळे नागरिक जुलाब , मळमळ व पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत . परिसरात घाण पाण्याचे तळे साचल्याने श्रावणलाल मोदी शाळेतील ३०० विद्यार्थ्यांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे . तसेच शाळेत मोकाट कुत्रे शिरतात . त्यामुळे शाळेच्या गेटवर एका शिक्षकाला पहारा द्यावा लागतो . मनपा प्रशासनाला निवेदन देऊनही प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे . सह्याद्रीनगर , अर्थनगरात उंचीवरील वसाहती व इतर भागातील ड्रेनेजचे पाणी शिरते . पावसामुळे अनेकांच्या घरांसमोर घाण पाणी साचते . त्यामुळे मच्छरांचाही उपद्रव वाढतो . मनपाने मुख्य ड्रेनेजलाइन तयार करून त्यात कनेक्शन जोडल्यास ही समस्या सुटू शकते . मात्र , याकडे मनपा दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .