शिक्रापूरचे पोलीस हवालदार अमीरुद्दीन चमनशेख यांचे निलंबन
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांना पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार व्यक्तीकडून पैशाची मागणी केल्याच्या आरोपावरून कारवाई करत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी निलंबित केले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन येथे एका इसमाने फसवणुकीबाबत तक्रारी अर्ज दिला होता, सदर अर्ज चौकशीसाठी पोलीस निरीक्षक यांनी पोलीस हवालदार अमीरुद्दीन चमनशेख यांच्याकडे दिला असताना त्यांनी सदर अर्जावर कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही तसेच तक्रारदार यांच्याकडे पैशाची मागणी केली होती, याबाबत तक्रारदार यांनी पैसे मागितल्याबाबतची ऑडीओ क्लिपसह पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार केली होती, त्याबाबत ची चौकशी केल्यानंतर पोलीस हवालदार अमीरुद्दीन चमनशेख यांनी संबंधित अर्ज चौकशी कामी संशयास्पद वर्तन करुन आर्थिक लाभाच्या प्राप्तीच्या हेतुने कोणत्याही समर्थनीय कारणाशिवाय अर्ज चौकशी प्रलंबित ठेवली असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आल्याने चमनशेख यांनी पैशाची मागणी करुन शासकिय सेवकास अशोभनीय असे गैरवर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९७९ मधील नियम क्रमांक ३ चे उल्लंघन केले तसेच शासकिय सेवेत दाखवलेल्या बेशिस्त, बेजबाबदार व पोलीस खात्याला अशोभनीय अश्या वर्तनाबद्दल त्यांचेविरूध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात आली असून पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांना शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्या अधीन राहुन सेवेतुन निलंबित केल्याबाबतचे पत्रक पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहे. तसेच पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांना निलंबन कालावधीत पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण यांचेकडे नियमानुसार सकाळ व संध्याकाळी असे दिवसातून दोनवेळी हजेरी लावणे देखील बंधनकारक असल्याचे देखील सदर पत्रकात म्हटले आहे.