बीड (प्रतिनिधी) - गेल्या दोन वर्षात दोन आंदोलने करूनही महात्मा गांधीजींच्या विचारांचे प्रतीक असलेल्या तीन माकडांपैकी तुटलेले एक माकड नवीन आणून बसविण्यात जिल्हा प्रशासन व बीड नगरपरिषद प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याने यावेळीही महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी तिसऱ्यांदा सामाजिक कार्यकर्ता संघटनेकडून उपोषण पुकारण्यात आले होते परंतु बीड नगर परिषदेचे नवनियुक्त व अल्पावधीतच कर्तव्यनिष्ठ असल्याचे प्रत्यय आणून देत असल्याने शहरभरात लोकप्रिय झालेले मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानंतर लेखी आश्वासन दिले की, आंदोलनकर्त्यांनी उपोषण करू नये. लवकरात लवकर गांधीजींच्या विचाराचे संदेश देणाऱ्या एका माकडाची तुटलेली प्रतिकृती नवीन आणून बसविण्यात येईल. मात्र एक प्रतिकृती इतर दोन माकडांपेक्षा वेगळी होऊ नये सर्व माकडांच्या प्रतिकृती या समसमान म्हणजेच एकसारख्या असायला हवेत याकरिता तिन्ही प्रतिकृती नवीन आणून बसविण्यात येईल. मात्र याकरिता आंदोलनकर्त्यांनी उपोषण सारखे मार्ग अवलंबू नये. उपोषण स्थगित करावे. अशी विनंती केल्यावर सामाजिक कार्यकर्ता संघटनेने उपोषणाऐवजी फक्त लाक्षणिक आंदोलन केले व विश्वास व्यक्त केला की, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावाजले जात असलेले मुख्याधिकारी उमेश ढाकणे हे स्वतः जातीने लक्ष घालून तोडफोड करण्यात आलेल्या माकडाची प्रतिकृती लवकरात लवकर नवीन बसवतील. या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ता संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, संजय नवले, बाबा जायभाय, डॉ. विवेक कदम, विनोद इंगोले, पांडुरंग सोनवणे, तांबडे सर आदींनी सहभाग नोंदविला.