रत्नागिरी : जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्यामुळे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे.जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींपाठोपाठ ग्रामपंचायतींवरही प्रशासकीय राजवट राहणार असल्याने गावाचा कारभार हा अधिकार्यांच्या हाती जाणार आहे.
ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आवश्यक ते नियोजन निवडणूक आयोगाकडून केले जात आहे. ते पूर्ण होण्यापूर्वीच ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ग्रा.पं.चा पाच वर्षांचा कालावधी जसा पूर्ण होत जाईल तसे तिथे प्रशासक नेमण्याची कार्यवाही केली जावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.