अवैध गर्भपाताचा कायदा असताना सुध्दा काही डॉक्टर मंडळी पैसे कमावण्यासाठी अवैध गर्भलिंग निदान करून गर्भपात करतात. त्यामुळे अस्तित्वात असलेला अवैध गर्भपाताचा कायदा अधिक कडक करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करत जिल्ह्यातील सर्व ऊसतोड मजुरांना त्या त्या कारखान्यावर राशनचे धान्य मिळण्याची व्यवस्था करावी. महिलांसाठी कारखान्याने स्वच्छतागृह बांधावेत. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांच्या वस्तीगृह बांधण्यासाठीचा जो निधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा. असे निर्देश निलमताई गोर्‍हे यांनी प्रशासनाला दिल्याचे सांगितले.

बीड येथे आज ऊसतोड कामगार महिलांची परिषद होत आहे. या परिषदेला उदघाटक म्हणून विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोर्‍हे बीड येथे आल्या असता त्या पत्रकाराशी संवाद साधत होत्या. पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये काही अवैध गर्भपाताचे प्रकरणे घडले आहेत. यामध्ये काही दलाल असून पैसे कमावण्यासाठी डॉक्टर मंडळी असे दुष्कृत्य करतात. त्यामुळे हा कायदा अधिक कडक करावा. बीड जिल्ह्यामध्ये महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यावेळेस राज्य सरकारने माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. आमच्या समितीने अभ्यास करून काही शिफारशी सरकारला सुचवल्या होत्या. हा अहवालही सरकारने स्विकारला आहे. मात्र काही कारखान्याकडून आम्ही सुचवलेल्या शिफारशीची अमलबजावणी होत नाही असे लक्षात आले आहे. आज बीड येथे आले असता जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि कामगार विभाग यांची संयुक्त बैठक घेत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी तात्काळ महिलांसाठी कारखाना परिसर आणि ऊसतोडीच्या ठिकाणी आवश्यक असेल त्याठिकाणी महिलांसाठी स्वच्छता गृह बांधावीत, त्यांना मिळणारे धान्य कारखान्यावर उपलब्ध करून द्यावेत यासर्व ऊसतोड कामगारांचा नोंदणी आणि विमा काढून घेण्यात यावा. सोबतच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ऊसतोडीला जाण्यापूर्वी ऊसतोड कामगार महिलांची आरोग्य तपासणी करावी. आवश्यक ते उपचार करावेत. सोबत कारखान्याहून आल्यानंतरही या महिलांची तपासणी करावी असेही निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत असे निलमताई गोर्‍हे यांनी सांगितले आहे. या पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या श्रीमती ठाकरे आणि इतर महिला पदाधिकार्‍यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आपासाहेब जाधव हे ही उपस्थित होते.