गुहागर : मला लघुशंका झालेय, गाडी थांबवा असे सांगून लघु शंकेला गेलेल्या आरोपीने तिथूनच जंगलात पलायन केल्याची घटना काल घडली होती. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने 4 तासातच घेतले ताब्यात. शिवराम नारायण साळवी याच्यावर पॉस्को अंतर्गत 2015 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस दुचाकीवरून चिपळूण न्यायालयात घेऊन गेले होते. न्यायालयात त्याचे जबाब घेतल्यानंतर पुन्हा गुहागरच्या दिशेने नेण्यात येत होते. यावेळी शुक्रवार 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोलिस दुचाकीवरून घेऊन जात असताना चिखली येथे संशयित आरोपी शिवराम साळवी याने मला लघुशंकेला जायचं आहे असे पलायन केले होते.  

 आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी चिखली येथील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली. आरोपी हा जास्त लांब जाणार नाही, काळोखात तो कुठेतरी आसरा घेणार याची पोलिसाना कल्पना होती. यादृष्टीने तपास सुरू होता. परिसरातील नदी, नाल्यामध्येही शोधण्यात आले मात्र सापडत नव्हता. आरोपीने एका मंदिराचा आसरा घेतला होता. तिथे तो झोपणार होता एवढ्यात पोलिस आणि ग्रामस्थांच्या शोधण्याचा आवाज ऐकू आला. आपल्या मागावर पोलिस आहेत याची त्याला कल्पना होतीच. तो सावध झाला. मंदिरातून बाहेर पडून त्याने एका खड्ड्यांचा आसरा घेतला. चिखल आणि मातीमुळे त्याचे कपडे लाल झाले होते. त्याला शोधणे कठीण झाले होते. पोलिसांनी डबक्यामध्ये दगड मारायला सुरुवात केली. यामुळे तो पळण्याचा प्रयत्न करेल असे वाटले होते. दगडांचा मारा करत असताना एका डबक्यात दडून बसलेल्या शिवराम याच्या काही दगड लागले. यावेळी अजून दगड लागून जखमी होऊ या भीतीमुळे त्याने पोलिस कुठे आहेत याची खात्री करण्यासाठी डोके वरती काढले. आणि याचवेळी काहीतरी दिसतेय म्हणून पोलिसांनी तिकडे नजर फिरवली. बॅटरी च्या प्रकाशात त्याचे डोके दिसून आले. ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी लगेचच त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. अवघ्या 4 तासात आरोपीला पकडण्यात पोलिसंना यश आले. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फरार झालेल्या आरोपीला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी शोधून काढले. त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.