कन्नड : एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले असून जनसामान्यांत प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. त्यामुळे बिकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याची सभा ना भूतो ना भविष्य अशी सभा होईल या मेळाव्यास प्रचंड संख्येने सहभागी होवून ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. सिल्लोड मतदार संघातून 25 हजारहून अधिक शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी जाणार आहेत. त्यापाठोपाठ कन्नड मतदारसंघातून शिवसैनिक बिकेसी वरील दसरा मेळाव्यास जाणार असल्याचा विश्वास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.मुंबई येथील बिकेसी मैदानावर दि. 5 ऑक्टोबर रोजी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्याअनुषंगाने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कन्नड शहरातील गांधी भवन येथे पूर्वतयारी बाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करीत असतांना मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी कन्नड शिवसेनेच्या वतीने . अब्दुल सत्तार यांचा भव्य स्वागत सत्कार करण्यात आला.मुख्यमंत्री 18 तास काम करतात. त्यांच्या कामाचा धडाका पाहून विरोधकांची झोप उडाली अशी मिश्किल टीका मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. एकनाथ म्हणजे लोकनाथ अशी भावना जनसामान्यांतुन व्यक्त होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी कन्नड - सोयगाव मतदारसंघातून प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.