चिपळूण : चिपळूणच्या सुकन्या व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर औरंगाबाद येथील न्यायाधीश डॉ. उज्वला मुसळे यांनी लिहिलेल्या महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र अधिनियम १९९४ च्या अंमलबजावणीसाठी न्यायव्यवस्थेची भूमिका, या पुस्तकाचे प्रकाशन चिपळूण येथे दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता' लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती डॉ. सी. शालिनी फणसळकर-जोशी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
हे पुस्तक निश्चितच समाजातील प्रत्येक घटकाला मार्गदर्शक ठरणार आहे. हा कार्यक्रम उच्च न्यायालय मुंबई माजी न्यायमूर्ती डॉ. सौ शालिनी फणसळकर-जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश पुणे येथील सुनिल वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश रत्नागिरी एल. डी. बिले, जिल्हा न्यायाधीश चिपळूण एन.एस. मोमीन यांची उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर प्रांताधिकारी प्रवीण पचार, वकील संघ चिपळूणचे अध्यक्ष एन. एस. सावंत आणि संदर्भ प्रकाशन औरंगाबादचे संचालक बी. आर. काळे यांची उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र अधिनियम १९९४च्या अंमलबजावणीसाठी न्यायव्यवस्थेची भूमिका या पुस्तकातून समाजातील एक सत्य आणि न्यायव्यवस्थेबाबत असणारी भूमिका याचे विवेचन अतिशय सुंदर प्रकारे पुस्तकाच्या लेखिका डॉ. उज्वला मुसळे यांनी केले आहे. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला चिपळूणवासियांनी उपस्थित राहावे, असे आवाहन न्यायाधीश डॉ. उज्वला मुसळे यांनी केले आहे.