रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गणना होत असलेल्या शिरगावमध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलतर्फे निवडणूक लढवली जात आहे. यामध्ये माजी सरपंच रज्जाक काझी यांना निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आले असून, याठिकाणी सरपंचपदासह सर्व जागा जिंकण्याचा विश्वास शिवसेना उपनेते व आ. राजन साळवी यांनी व्यक्त केला. 

निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी पुरस्कृत गावविकास पॅनलतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार व शिवसेना उपनेते राजन साळवी, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, सुदेश मयेकर, मिलींद कीर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, हारिस शेकासन, सेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, पॅनलचे निमंत्रक रज्जाक काझी व पदाधिकारी उपस्थित होते.

मागील सहा वर्षात गावाचा काहीच विकास झाला नाही. येथील आमदारांनी गावच्या विकासासाठी एक फुटका पैसा दिला नाही, असा आरोप रज्जाक काझी यांनी केला. पाण्याच्या बिलापोटीच सुमारे सात ते आठ कोटी रुपये एमआयडीसीचे ग्रामपंचायत देणे लागत आहे. यावरही मागील पाच वर्षात तोडगा निघाला नाही. शहरातील सांडपाणी मोठ्याप्रमाणात गावच्या नदीत सोडले जात आहे. त्यामुळे गावाला पाणी पुरवठा करणार्‍या विहीरीही दुषित होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना शुध्द पाणी मिळावे यासाठी फिल्टरेशन प्लॅन्ट बसवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे रज्जाक काझी यांनी सांगितले. विकास कामे न झाल्याने ग्रामस्थांचा महाविकास आघाडीच्या गाव पॅनलला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीत शिरगावमध्ये सेनेला सात, राष्ट्रवादी सहा तर काँग्रसला चार जागा देण्यात आल्या असल्याचेही काझी यांनी स्पष्ट केले.