औरंगाबाद : सन्मान दिला नाही तरी चालेल पण किमान अपमान तरी करू नका , अशी अपेक्षा भाजपच्या ज्येष्ठ जनसंघाच्या काळातील पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रोजगार , कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांच्यापुढे व्यक्त केली . २०२४ ची औरंगाबाद लोकसभा निवडणूक शिंदेसेनेला सोबत घेऊन लढण्यासाठी भाजपची तयारी सुरू झाली . त्याचा पहिला टप्पा म्हणून केंद्रीय रोजगार , कामगारमंत्री भूपेंद्र यादव शुक्रवारी ( ३० सप्टेंबर ) रोजी शहरात आले होते . त्यांनी आयएमए सभागृहात बैठक घेतली . माजी आमदार रामभाऊ गावंडे , पैठणचे माजी आमदार भाऊ थोरात , भाऊसाहेब दहिहंडे , दयारामबसैये , संजय खनाळे , दिलीप सोनवळकर , ज्योती चिटगोपेकर , नंदिनी कोरटकर , आसाराम तळेकर , पापा पालोदकर आदींची उपस्थिती होती . तेव्हा थोरात यांनी माझ्या पैठण विधानसभेत भाजपच्या पोस्टर , बॅनरवर माझा फोटो नसतो त्यामुळे खंत वाटते . त्यावर हरिभाऊ बागडे म्हणाले की , तुमच्या मुलास औरंगाबादेतून नगरसेवक केले . मलाही यादव यांच्या उपस्थितीत होणाऱ्या इतर बैठकांना निमंत्रण नव्हते , असे सांगितले . यादव यांनी ज्येष्ठांचा सन्मान राखला जाईल . तुमच्यामुळे ३७० कलम रद्द करणे , राम मंदिर उभारणी शक्य झाली , असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला .