रत्नागिरी : जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग यांच्यामध्ये पेण (रायगड) येथील निओ एनर्जी प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून कोकणात सुमारे ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक आहे. पेण येथे ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प उभा राहणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन, कंपनीचे शिष्टमंडळ व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी
जेएसडब्ल्यूच्या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. जास्तीत – जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग काम करीत असल्याचे उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारे हे शासन आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यामध्ये ७५ हजार तरूणांना रोजगार देण्याचा मानस राज्य सरकारचा असून त्याअनुषंगाने उद्योग विभाग कार्य करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.