परभणी,दि.30 : सद्या राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. नवरात्रीनिमित्त अनेक भाविक श्रध्देचा भाग म्हणुन उपवास ठेवतात. उपवासाच्या काळात बऱ्याचदा भगरीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने नागरीकांनी भगर खरेदी करतांना पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.

 भगर व इतर पदार्थ खरेदी करतांना परवानाधारक, नोंदणी धारक आस्थापनेकडुनच खरेदी करावी. पॅक बंद असलेले भगर, उपवासाचे पदार्थच विकत घ्यावेत. सदर पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, बॅच नंबर इत्यादी तपासून खरेदी करावेत. पॅकेटवर प्रकीया उद्योगात भगरीचे उत्पादन केंव्हा झाले याचा तपशील असतो, तो निट पाहुन घ्यावा. त्यासह ‘Best Before’ म्हणजे भगरीची अंतीम वापरण्याची मुदत केंव्हा संपत आहे, हे तपासूनच खात्री करून खरेदी करावी. भगरीचे सुटे पीठ खुल्या बाजारातून, हातगाडीवरून विकत घेवू नये. बाजारातून पॅकबंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ करुन व नंतर स्वच्छ धुवुनच घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे. खरेदी केलेल्या भगर या अन्नपदार्थाचे विक्रेत्याकडुन पक्के खरेदी बिल घ्यावे. सकाळी बनविलेली भगर संध्याकाळी , रात्री शिळी झाल्यानंतर तिचे सेवन करु नये. भगर व इतर उपवासाचे अन्न पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत. तसेच ते तयार करण्यासाठी पिण्या योग्य पाण्याचाच वापर करण्यात यावा. असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) तथा पदावाधित अधिकारी, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.