चुलत आजी आजोबा यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र आणि मृत्यु प्रमाणपत्रासाठी केलेल्या मागणी अर्ज व हरकती अर्जांच्या प्रती देण्यासाठी 8 हजार रुपये लाच घेताना कुसगाव खुर्द ग्रामपंचायतीचा सरपंच आणि ग्रामसेवकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.30) ग्रामपंचायत कार्यालय, कुसगाव खुर्द येथे केली.
सरपंच अनिल बाळू येवले (वय-33) आणि ग्रामसेवक अमोल बाळासाहेब थोरात (वय-34) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी 33 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे गुरुवारी (दि.29) तक्रार केली होती.
तक्रारदार यांनी त्यांचे चुलत आजी आजोबा यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तसेच त्यांचे चुलत आजोबा यांच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी केलेले मागणी अर्ज व हरकती अर्ज यांच्या प्रती मिळण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. सरपंच अनिल येवले यांनी दाखले देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार केली.पुणे एसीबीच्या पथकाने गुरुवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता कुसगाव खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच येवले यांनी दाखले देण्यासाठी 10 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 8 हजार रुपये स्विकारण्याचे कबुल केले.
त्यानुसार शुक्रवारी (दि.30) ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून 8 हजार रुपये लाच घेताना सरपंच येवले याला रंगेहाथ पकडले.तर येवले याला लाच घेण्यास ग्रामसेवक थोरात याने प्रोत्साहन दिले.
दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सीमा आडनाईक करीत आहेत.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.