रत्नागिरी : मागील काही दिवसांमध्ये सोशल मिडीयावर मुले पळविणाऱ्या टोळया या संदर्भात काही अफवा, व्हिडीओ क्लीप्स, ओडीओ क्लीप्स मोठया प्रमाणावर सामान्य नागरीकांमध्ये फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होताना दिसून येत आहेत. यामुळे प्रामुख्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. पालकांच्या मनामध्ये उद्भवणारी भिती कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

पसरणाऱ्या अफवांमुळे पालकांनी शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू देवू नये तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होऊ नये म्हणून व विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. डॉ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक , रत्नागिरी यांनी दिनांक २७ / ०९ / २०२२ रोजी राजापूर व नाटे पोलीस ठाणे हद्दीमधील दुर्गम / अतिदुर्गम भागात असणाऱ्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप कार्यक्रम राजापूर पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आला. जेणेकरुन दुर्गम भागातील गरजु विद्यार्थी यांना शाळेत वेळेवर पोहचणे व वेळेवर घरी येणे सुलभ होईल तसेच पालकांच्या मनामधील असणारी भिती दूर होण्यास मदत होईल या संकल्पनेतून राजापूर व नाटे पोलीस ठाणे हद्दीमधील ८ शाळेतील २७ मुले व २५ मलींना अशा एकूण ५२ विद्यार्थ्यांना सी.एस.आर. च्या प्राप्त निधीतून ५२ सायकलचे मोफत वितरण करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राध्यापक , शिक्षक वर्ग , पालक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. श्री. डॉ. मोहित कुमार गर्ग, ( भापोसे ) पोलीस अधीक्षक , रत्नागिरी यांनी रत्नागिरी जिल्हयात मुले पळविणाऱ्या टोळी अस्तित्वात नसल्याचे सांगितले तसेच अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका ! असे उपस्थित नागरीकांना आवाहन केले व शिक्षण हेच प्रभावी अस्त्र असल्याचे सांगितले व अधिक मदतीकरीता ११२ वर संपर्क करण्याकरीता व जलद प्रतिसाद मिळण्याकरीता आवाहन केले. 

सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री. निवास साळोखे, उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा उपविभाग , श्री जनार्दन परबकर, पोलीस निरीक्षक, राजापूर पोलीस ठाणे, श्री. आबासो पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, नाटे पोलीस ठाणे तसेच राजापूर, नाटे पोलीस ठाणे व वाचक शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले . या मोफत सायकल वाटप उपक्रमांमुळे राजापूर व नाटे पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणाऱ्या दुर्गम भागातील विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गामध्ये हर्षोउल्हासाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.