भाजपा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांच्या गावातील व तेथील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार माझ्याकडे सदरच्या निधीची मागणी केली होती. त्यांनी सुचविलेल्या विकास कामांकरीता मी ग्रामविकास मंत्री मा. गिरीश महाजन यांच्याकडे पत्राद्वारे सदरच्या कामांची व त्यांच्या निधीची मागणी केली होती. या मागणीनुसार पहिल्या टप्प्यात बार्शी तालुक्यातील ५० गावांतील विकास करणे करिता ५ कोटी रुपयांचा निधी, २५१५ योजने अंतर्गत ग्रामविकास खात्याकडून मंजूर झाला आहे.
महाराष्ट्रातील मागील तीन महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार कडून तालुक्यातील विकास कामांकरीता ग्रामविकास खात्यामार्फत पहिल्या टप्प्यातील या निधीच्या मंजुरीनंतर बार्शी तालुक्यातील उर्वरित गावांकरीता ग्रामविकास खात्याकडून दुसरा टप्प्याचा निधी मंजूर होणार आहे. त्याचबरोबर इतर गावांकरिता जन-सुविधा योजना, तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमधून, आमदार निधी व विधान परिषदेच्या आमदार निधीतून तालुक्यातील ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध करणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
सदरचा निधी बार्शी तालुक्यातील पिंपळगाव धस, बाभळगाव, कोरेगाव, भालगाव, देवगाव, ढोराळे, इर्ले, नारी शेंद्री,जहानपूर, धोत्रे, कळंबवाडी पा, पांगरी, जामगाव आ, नांदणी, गौडगाव, पानगाव, भोईंजे, उक्कडगाव, गाडेगाव, अरणगाव, वानेवाडी, मुंगशी वा, चिखर्डे, घारी, कळंबवाडी आ, बावी आ, नारीवाडी, इंदापूर, कासारवाडी, मालवंडी, खांडवी, नागोबाची वाडी, फपाळवाडी, गाताची वाडी कदम वस्ती, भोयरे, ताडसौंदणे, पिंपरी पा, कुसळंब, कव्हे, कोरफळे, धानोरे, पिंपळगाव दे, दहिटणे, तडवळे, ममदापूर, चिंचोली, पुरी, तुर्क पिंपरी या गावांकरीता प्रत्येकी १० लाख रुपये प्रमाणे एकूण ५ कोटी रूपयांतून गावातील रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे, नवीन बंदिस्त गटार बांधणे ही विकास कामे करण्यात येणार आहेत.