इन्व्हॉरॉथॉन 1.0 स्पर्धेचे सोलापूर विद्यापीठात पारितोषिक वितरण

सोलापूर - भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. देशाचे भविष्य घडविण्याचे आणि विकासातील अडथळे दूर करण्याचे सामर्थ युवकांमध्ये आहे.  युवकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे उद्योजकतेच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतात असे ते म्हणाले. तसेच पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहणे आवश्यक असल्याचे मत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी  मांडले. बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ उद्यम-नवउपक्रम फाउंडेशन आणि भूशास्त्र संकुल तथा इन्क्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने इन्व्हॉरॉथॉन 1.0 स्पर्धेचे सोलापूर विद्यापीठात पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त पी.शिवशंकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी नवसंशोधन, नवउपक्रम आणि साहचर्य मंडळ चे संचालक डॉ. सचीन लड्डा  यांनी प्रास्ताविक केले.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, जगभरातील आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थांमध्ये प्रमुख पदांवरती भारतीय कार्यरत आहेत. भारतातील युवकांनी स्वतःच्या बुद्धीचा आणि ऊर्जेचा योग्य वापर करून देशाच्या विकासास चालना द्यावी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील नावलौकिक प्राप्त करावा. सोलापूर विद्यापीठाच्या  उद्यम आणि नवसंशोधन, नवउपक्रम आणि साहचर्य मंडळ हे अनेक नऊपक्रम व नवसंशोधनच्या संधी सोलापूरातील युवकांना उपलब्ध करून देत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कौशल्य विकासाचे कोर्सेस विद्यापीठाने सुरू केले आहेत, त्याचा फायदा सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना होत आहे, असे ही कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या. शाश्वत विकासासाठी पर्यावरण हा घटक महत्वाचा आहे त्यामुळे पर्यावरणाकडे विशेष लक्ष देऊन त्याचे संवर्धन व संरक्षण करावे असे देखील त्या म्हणाल्या.

पर्यावरणाच्या संकल्पनेवरती आधारित स्टार्टअप कल्पनेच्या संदर्भात इन्व्हॉरॉथॉन 1.0 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतभरातून एकूण ८८ स्पर्धक सदर स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेत सर्जेराव दोलताडे आणि त्यांचे सहकारी यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. दुसरा क्रमांक यल्ला ओमकार वेंकटा आणि त्यांचे सहकारी यांनी प्राप्त केला तर तृतीय क्रमांक इंदेरन कन्नन आणि त्यांचे सहकारी यांनी प्राप्त केला. मनीष बाजपेयी, डॉ.प्रवीण नायडू उमदीशेट्टी आणि त्यांचे सहकारी, सायली उबाळे आणि त्यांचे सहकारी यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमात डॉ. मृणालिनी फडणवीस आणि डॉ. विनायक धुळप यांनी संपादित केलेल्या विद्यापीठ परिसरातील वनऔषधांच्या  ज्ञानकोशाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उद्यम PAHSUI फाउंडेशन इन्कुबॅशन सेंटर अंतर्गत १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ ला घेण्यात येणाऱ्या सोलापूर ई-कट्टा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यंदाचे सोलापूर ई कट्टा यावर्षी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर( ऑटोनॉमस) यांना होस्तिंग इन्स्टिट्यूट होण्याचा मान मिळाला. 

कार्यक्रमाचे समन्वयन इन्क्युबेशन सेंटरचे श्रीनिवास पाटील व श्रीनिवास नलगेशी यांनी केले.  कार्यक्रमप्रसंगी विद्यापीठातील विविध संकुलाचे संचालक, विभागप्रमुख,प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच डॉ.व्ही.ए.आठवले आणि डॉ.डी.डी. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार पर्यावरणशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी मानले.