महाराष्ट्र वीरशैव सभेकडून विश्वनाथ चाकोते यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

सोलापूर :- सोलापूरचे माजी महापौर तसेच माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी वीरशैव समाजातील सर्व घटक जोडण्याचे महत्वाचे काम केले आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र वीरशैव सभेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रफुल्लचंद्र झपके यांनी केले. नाशिक येथील बसवंत पिंपळगांव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र वीरशैव सभेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विश्वनाथ चाकोते यांना वीरशैव समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानपत्र देवून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी प्रा.झपके बोलत होते. 

प्रारंभी महाराष्ट्र वीरशैव सभेचे सरचिटणीस बाळासाहेब होनराव यांनी प्रास्ताविक केले. वीरशैव सभेच्या कार्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले प्रा. प्रफुल्लचंद्र झपके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना वीरशैव सभा ही समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करत आहे. विश्वनाथ चाकोते यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात आजपर्यत समाजासाठी मोलाचे योगदान दिले आहे. राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी करून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळेच त्यांना महाराष्ट्र वीरशैव सभेच्या वतीने मानपत्र देवून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे असेही प्रा. झपके यांनी सांगितले.

माझा गेल्या 37 वर्षाच्या कार्यकाळात अनेक ठिकाणी अनेक संस्था संघटनांकडून सत्कार सन्मान झाला परंतु मी आजपर्यत केलेल्या कामाची पोहोच पावती ही समाजाकडून मिळालेल्या जीवन गौरव पुरस्काराने मिळाली आहे. हा माझ्या घरचा पुरस्कार आहे या पुरस्काराने मला अजून चांगले कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आहे. मी सोलापूरचा महापौर, आमदार, राज्यमंत्री दर्जा असलेल्या महामंडळाचा अध्यक्ष होतो. या सर्व पदांचा उपयोग मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी केला आहे. माजी आमदार कै. बाबुराव आण्णा चाकोते यांचा वारसा घेवून सामाजिक कार्य करण्यास सुरूवात केली युवा आघाडीचा भव्य दिव्य मेळावा सोलापूरमध्ये मी घेतला होता त्या मेळाव्यातील माझे कार्य पाहून कै.डॉ. शिवमुर्ती शाहीर यांनी माझ्या कामाची दखल घेत युवा आघाडीत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. महाराष्ट्र वीरशैव सभेत अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली त्यातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात फिरून समाजातील लोकांशी संपर्क साधला आणि त्यांच्या अडचणी सोडवल्या. संघटनशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले. वधुवर सूचक मंडळ स्थापन केले. वीरशैव दर्शन हे मुखपत्राचे सभासद संख्या वाढवली. सातारा येथे महिला आघाडीचा मेळावा यशस्वीपणे पार पाडला. वीरशैव जोडो अभियान राबवण्यात आले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आयुष्यात समाजाचे देणे असते ते मी देण्याचा प्रयत्न केला आहे यापुढेही माझे कार्य असेच समाजासाठी चालू राहणार आहे असे आपल्या सत्काराला उत्तर देताना माजी आमदार विश्वनाथ चाकोते म्हणाले. 

त्यानंतर महाराष्ट्र वीरशैव सभेचे प्रदेश अध्यक्ष प्रा.प्रफुल्लचंद्र झपके यांच्या हस्ते विश्वनाथ चाकोते यांना मानपत्र देवून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर माजी अध्यक्ष नाशिकचे वसंतराव नगरकर यांनाही जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. 

याच दिवशी कन्यादिन असल्याने लहान मुलींचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर समाजासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या शिल्पाताई झारेकर, विद्याताई घोडके या महिलांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला पुण्याहून सुरेंद्र शेठ गाढवेे, चाळीसगांव येथील रमेश आवटे, कोल्हापूरहून सुनिल गाताडे, औरंगाबादहून जी आर परशेट्टी, अकोला येथील महेश आप्पा शेटे, नाशिकचे अध्यक्ष जगदीश घोडके, बसवंत पिंपळगांवचे अध्यक्ष आंबादासजी आंधळकर, मुंबई हून आलेले एस एम पाटील यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील वीरशैव सभेचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.